
खेड तालुक्यातील तिसंगी येथे एका युवकाने शेतात असलेल्या अजगराला फावड्याने ठार मारून जाळल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजगराला मारून जाळण्याचा विडिओ वायरल झाल्यावर सांगली येथील एका प्राणी मित्राने वनविभागाकडे तक्रार दाखल केली होती. बसवराज हौसगौडर असे या प्राणी मित्राचे नाव आहे.
खेड तालुक्यातील तिसंगी निकमवाडी येथील एका शेतकऱ्यांच्या शेतात मोठा अजगर आढळला. येथील महेश राजाराम निकम या युवकाने या अजगराला फावड्याने मारून त्याला जाळून टाकले. या संपूर्ण घटनेचा विडिओ वायरल झाल्यावर सांगली येथील प्राणीमित्र बसवराज होसगौडर यांनी सांगलीचे सहाय्यक वनरक्षक डॉ. अजित साजणे यांच्यामार्फत रत्नागिरीच्या सहाय्यक वनरक्षकांकडे या घटनेची तक्रार केली. रत्नागिरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौजे तिसंगी निकामवाडी येथे जाऊन संशयित महेश राजाराम निकम याच्या घरी चौकशी केल्यानंतर महेश निकम याने एक महिन्यापूर्वी हा गुन्हा केल्याचे कबूल केले.
अजगराला मारून जाळल्यानंतर महेश याने त्याला घराच्या मागील बाजूस शेतात खड्डा काढून पुरले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत अजगराचा पंचनामा करून त्याचे अवशेष वन विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर महेश निकम यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































