परीक्षा होणार सोपी… दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नमुना प्रश्नसंच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे परीक्षेची नीट तयारी करता न येणाऱया दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही अंशी परीक्षा सोपी होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशी असेल याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) प्रश्न प्रकारांचा सराव हा उपक्रम आजपासून सुरू केला आहे. पहिल्याच दिवशी राज्यातील तब्बल 94 लाखांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी एससीईआरटीच्या वेबसाईटला भेट दिली आहे.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नसंचांचा लाभ होईल अशी अपेक्षा एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी व्यक्त केली. प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या प्रकारांच्या सरावासोबतच एससीईआरटीकडून ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी आणि विज्ञान आदी विषयांसाठी सह्याद्री वाहिनीवर तज्ञ शिक्षकांचे वर्ग आयोजित केले आहेत.

यासाठी 2 एप्रिलपर्यंत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पुन्हा वाढ केली जाणार आहे. सुरुवातीला हा कार्यक्रम तब्बल 15 दिवस चालणार असून पुढे त्यासाठी मुदत वाढवली जाणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना सुरुवातीला सकाळी 12.30 ते दुपारी 3.30 पर्यंत या वाहिनीवर हे वर्ग पाहता येणार असल्याची माहिती एससीईआरटीकडून देण्यात आली. पहिल्या आठवडय़ात प्रत्येकी दोन ते तीन तास आणि पुढे चार तर 13 एप्रिलपासून सह्याद्रीवरील वर्गांची वेळ आठ तासांवर असणार असेल आणि यातून विद्यार्थ्यांना सराव, प्रश्नांची सोडवणूक आदी विषयांवरील अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली.

दहावीच्या गणित-भाग-1, भाग-2, मुख्य भाषा इंग्रजी,कुमारभारती, इतिहास आणि राज्यशास्त्र, भूगोल (मराठी आणि इंग्रजी माध्यम) आदी विषयांच्या प्रश्न प्रकार आणि त्यासाठी सह्याद्री वाहिनीवर वर्ग असणार आहेत. तर बारावीच्या जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल, इंग्रजी आदी विषयांवर सह्याद्री वाहिनीवर तज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारी आणि प्रश्नपत्रिकांच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. https://t.co/Ugilxs0qsF या लिंकवर प्रश्नसंच उपलब्ध होतील.