अलीकडच्या काळातील घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलीकडच्या काळात घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या प्रत्येक तक्रारीची तत्काळ दखल घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही केली तर जनतेच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास वाढेल, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज केले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील गुह्यांसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, संजय वर्मा, अनुपकुमार सिंग, विनय कारगावकर, सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र सेनगांवकर, सहआयुक्त मिलिंद भारंबे, विश्वास नांगरे-पाटील यांसह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

प्रतिमा सुधारा

पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

कारवाई मुदतीत आवश्यक

राज्यात गुन्हे घडतात त्याचा तपास पूर्ण होतो; परंतु वर्षानुवर्षे न्यायालयात खटले सुरू राहतात. न्यायालयात प्रलंबित असलेल्या अशा खटल्यांचा मागोवा घेऊन आरोपीला शिक्षा होण्याबरोबरच त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे. कोणत्याही घटनेचा तपास, गुन्हा नोंद अथवा अन्य कारवाई  मुदतीत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.