कतार फुटबॉल वर्ल्ड कपचा बिगुल वाजला, पहिल्यांदाच नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये होणार स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कतार फुटबॉल वर्ल्ड कपचा बिगुल दणक्यात वाजला आहे. 2022 सालामध्ये होणाऱया या मानाच्या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा याप्रसंगी मोठय़ा उत्साहात करण्यात आली. या स्पर्धेला 21 नोव्हेंबर, 2022 रोजी सुरुवात होणार असून या स्पर्धेच्या जेतेपदाचा पैसला 18 डिसेंबर, 2022 रोजी होणार आहे. आतापर्यंत फुटबॉल वर्ल्ड कप ही स्पर्धा जून – जुलै या महिन्यांमध्ये खेळवण्यात येते. मात्र यंदा यामध्ये बदल करण्यात आला आहे. या स्पर्धेत 32 संघ जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावतील.

साखळी फेरीत दिवसाला चार लढती
फिफाकडून या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. यावेळी साखळी फेरीत दिवसाला चार लढतींचे आयोजन करण्यात येणार आहे. हिंदुस्थानी वेळेनुसार या लढती अनुक्रमे दुपारी 3.30, संध्याकाळी 6.30, रात्री 9.30 आणि मध्यरात्री 12.30 या वेळेत पार पडतील. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढती रात्री 8.30 वाजता, तर उपांत्यपूर्व फेरीच्या लढती मध्यरात्री 12.30 वाजता होतील. उपांत्य फेरीच्या लढतींना मध्यरात्री 12.30 वाजता सुरुवात होईल.

या स्टेडियममध्ये होणार लढती
अल बायत (60 हजार क्षमता)
अल जानुब (40 हजार क्षमता)
अल रयान (40 हजार क्षमता)
अल थुमामा (40 हजार क्षमता)
एज्युकेशन सिटी (40 हजार क्षमता)
खलिफा (40 हजार क्षमता)
लुसैल आयकॉनिक (80 हजार क्षमता)
रस अबु अबुद (40 हजार क्षमता)

80 हजार फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत जेता ठरणार
80 हजार फुटबॉलप्रेमींची क्षमता असलेल्या लुसैल आयकॉनिक स्टेडियममध्ये या स्पर्धेच्या जेतेपदाचा पैसला होणार आहे. तिसऱया स्थानासाठीची लढत 17 डिसेंबरला खेळवण्यात येईल. या दोन्ही लढती रात्री 8.30 वाजता सुरू होतील. मिडल ईस्टमध्ये खेळवण्यात येणारा हा पहिलाच वर्ल्ड कप असणार आहे.