तू ढोंगी आहेस! ट्रोलरच्या टीकेवर आर. माधवनने दिलं ‘हे’ सणसणीत उत्तर!

828

सेलिब्रिटींना ट्रोल करणं ही आता सामान्य बाब झाली आहे. सहसा कलाकार अशा टीकांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. पण, अभिनेता आर. माधवन याने मात्र त्याला ढोंगी म्हणणाऱ्या एका नेटकरीला सणसणीत उत्तर दिलं आहे.

आर. माधवन याने 15 ऑगस्ट रोजी एक फोटो शेअर केला. या फोटोत तो, त्याचे वडील आणि त्याचा मुलगा यांच्यासह बसलेला दिसत आहे. राखी पौर्णिमा आणि स्वातंत्र्य दिनासह ‘अवनी अवित्तम’ या सणाच्या शुभेच्छा देणारी कॅप्शन त्याने खाली लिहिली. या फोटोमध्ये तो अवनी अवित्तम या सणाशी संबंधित काही धार्मिक विधी करताना दिसत आहे. फोटो शेअर झाल्यानंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. मात्र, एका चाहतीने त्या फोटोत ख्रिश्चन धर्मीयांचा क्रॉस शोधून काढला आणि त्यावरून त्याला ट्रोल केलं. या फोटोत मागच्या बाजूला क्रॉस का दिसतोय? हे मंदिर आहे का? तुम्ही कधी चर्चमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्ती पाहिल्यात का? तुम्ही माझा सन्मान गमावला आहे. आज तुम्ही जे केलंत ते एक ढोंग आहे, अशा शब्दात तिने त्याला ट्रोल केलं.

यावर गप्प न राहता आर. माधवन याने तिला सणसणीत उत्तर दिलं. तिला रिप्लाय देऊन तो म्हणाला की, मला अशा प्रकारच्या माणसांकडून सन्मानाची गरज नाही. मी आशा करतो की तुम्ही लवकर बऱ्या व्हाल. मला आश्चर्य वाटतं की, तुम्ही तिथे असलेला सुवर्ण मंदिराचा फोटो कसा पाहिला नाहीत आणि मला शीख धर्म स्वीकारण्याबद्दल कसं काय विचारलं नाहीत? तुम्ही पाहिलंत त्या ठिकाणी दर्गा आणि जगभरातल्या कित्येक धर्मस्थळांशी निगडीत वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यातल्या काही मला भेट म्हणून मिळाल्या आहेत, तर काही मी स्वतः खरेदी केल्या आहेत. ज्या प्रकारे एखाद्या सैन्यात प्रत्येक धर्माचे लोक असतात, तसंच माझ्या कर्मचाऱ्यांमध्येही अनेक धर्मीय लोकांचा भरणा आहे. माझ्या घरात एकच देवघर आहे, जिथे सर्व धर्मीय प्रार्थना करतात, असे कडक शब्दांचे ताशेरे ओढत माधवन याने चाहतीची बोलती बंद करून टाकली.

तो पुढे म्हणाला, मला लहानपणापासून हे शिकवलं गेलं आहे की, स्वतःच्या ओळखीचा अभिमान जरूर असावा, पण दुसऱ्याच्या श्रद्धेचाही तितकाच आदर करावा. मी प्रत्येक धर्माला पूजतो आणि मला आशा आहे की माझा मुलगाही हे सगळं आत्मसात करेल. जेव्हा मला पूजेसाठी मंदिर सापडत नाही, तेव्हा मी दर्गा, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये पूजा करतो. तिथे मी हिंदू आहे, हे माहीत असूनही मला अपार प्रेम मिळतं. जर असं असेल तर हे प्रेम मी वाटू नको का? माझ्याकडे देण्यासारखं फक्त प्रेम आणि आदर आहे आणि माझा आजवरचा अनुभवही मला हेच सांगतो, की प्रेम हीच खरी श्रद्धा आहे, असंही माधवन म्हणाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या