
वेगवेगळे प्रसंग आणि घटनांचे वळणं घेत राजकीय विश्लेषकांना तोंडघशी पाडणार्या नाशिक पदवीधर मतदार संघात आणखी एक नाट्यमय घडामोड समोर आली आहे. नगर दक्षिणचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपले पारंपरिक राजकीय वैरी समजल्या जाणार्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी हा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णय आहे, असे सांगून तांबे यांच्या समर्थनावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, या निमित्ताने विखे पिता-पुत्रांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांचा डाव यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सायंकाळी शिक्षक व पदवीधर मतदार स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची घोषणा करीत एकप्रकारे विधान परिषदेच्या आखाड्यातून आश्चर्यकारक माघार घेतली. त्या पार्श्वभूमीवर शनिवारीच खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी पक्ष देईल तो आदेश, हा ठेवणीतला शब्दप्रयोग करतांना भूमिपूत्राला विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत वक्तव्य केले होते.
थोरात-विखे यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या राज्याला ज्ञात आहे. असे असताना डॉ. विखे यांनी सत्यजीत तांबे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार करून आपली यंत्रणाही कामाला लावली आहे. विशेष म्हणजे सत्यजित तांबे यांनी भाजपाकडून पाठिंबा मागितलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापासून अगदी मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत घडलेल्या विविध राजकीय घडामोडींमूळे नाशिक पदवीधर मतदार संघ संपूर्ण राज्यात चर्चेत आला. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपकडून पाठींबा जाहीर होईल, असे अंदाज बांधून ‘त्या’ क्षणाची वाटं पाहण्यात पंधरा दिवसांचा काळ गेला, मात्र तसं काही घडलंच नाही. त्यामुळे या मतदार संघातील निवडणूक सत्यजित तांबे हे आपल्या वडिलांच्या ऋणानुबंधावरच लढतील, असे जवळपास निश्चित झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्षक व पदवीधर मतदार संघाबाबत स्थानिक पदाधिकार्यांना सर्वाधीकार देत एकप्रकारे विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघारच घेतली.
प्रदेश कार्यकारणीकडून अशा प्रकारचा निर्णय होणार असल्याची कदाचित पूर्वकल्पना असल्याने भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी शनिवारी नगरमध्ये जाहीर वक्तव्य करतांना ‘पक्ष आदेश देईल त्याला विजयी करण्यासाठी काम करू’ असे सांगतानाच भूमिपुत्राच्या पाठीशी उभे राहून त्याला निवडून आणण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे संकेतही दिले होते. शनिवारी सायंकाळी भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या घोषणेनंतर त्याचे पडसाद नगर जिल्ह्यात दिसून आले.
रविवार सकाळपासूनच खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांच्या सोशल माध्यमातील स्टेट्सवर सत्यजित तांबे यांच्या फोटोसह ‘विजयी भवः’ असे शब्द झळकू लागले आहेत. विखे पाटलांच्या यंत्रणेचा लौकिक सर्वश्रृत आहे, त्याच जनसेवा मंडळाच्या सोशल समूहातही अशाच प्रकारे सत्यजित तांबे यांचे फोटो झळकल्याने विखेंची यंत्रणा तांबेंसाठी कार्यरत झाल्याचे दिसू लागले आहे.
भाजपमधील ‘त्या’ ज्येष्ठांची खेळी यशस्वी
2019 च्या निवडणुकीमध्ये भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवणारे माजी मंत्री शिवाजी कर्डिले, प्रा. राम शिंदे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड या सर्वांचा पराभव झाला होता. त्यावेळेला विखे पिता-पुत्रांना पराभवाला कारणीभूत धरून तशी तक्रार ही भाजपच्या या सदस्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. त्याची चौकशीही करण्यात आली होती. मात्र या चौकशीचा रिपोर्ट अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यातच आता या सर्वांनी सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा देत विखे यांच्याविरुद्ध मोठी खेळी केली व अखेर पक्ष आणि पक्षातील पदाधिकारी यांच्यासमोर नमते घेत विखे यांच्यावर शेवटच्या क्षणी तांबे यांना पाठिंबा देण्याची नामुष्की ओढवली आहे. त्याचे पडसाद आज जिल्ह्यामध्ये पाहण्यास मिळाले.





























































