राधानगरीचे तीन दरवाजे अजूनही उघडलेलेच

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. एकीकडे पंचगंगेची पातळी 39 फूट इशारा पातळीच्या सात फूट खाली आली असली तरी दुसरीकडे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे अजूनही उघडलेलेच आहेत.

सायंकाळी पाचच्या सुमारास पंचगंगेची पातळी 31 फूट 11 इंच झाली असून, अद्यापि 23 बंधारे पाण्याखाली आहेत. सोमवारी सायंकाळी रात्री उशिरापर्यंत राधानगरी धरणाचे 3, 5 आणि 6 क्रमांकांचे स्वयंचलित दरवाजे उघडून, त्यातून 5 हजार 684 क्युसेक्स विसर्ग सुरू होता. तर मंगळवारी तिसरा दरवाजा बंद झाला असून 5 व 6 क्रमांकाच्या दरवाजातून 4256 क्युसेक विसर्ग सुरू होता. धरण क्षेत्रासह सर्वत्र पावसाचा जोर कमी-अधिक दिसून आला.