
दारू पिऊन जमिनीची वाटणी मागणाऱया मोठय़ा भावाने डोक्यात लाकडी ओंडका घालून लहान भावाचा खून केल्याची घटना तालुक्यातील कसबा तारळे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्रकाश विठ्ठल पाटील (वय 38)असे मृताचे नाव असून, धोंडीराम विठ्ठल पाटील (वय 44) याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृताचा चुलतभाऊ महादेव दादू पाटील यांनी राधानगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. कसबा तारळे येथे 15 वर्षांपूर्वी धोंडीराम यांच्या पत्नीचा जाळून खून या दोघा भावांनी केला होता. त्यामध्ये दोघांनाही शिक्षा झाली होती. ती शिक्षा भोगून आल्यानंतर ते कागल एमआयडीसीत काम करीत होते. या दरम्यान त्यांच्या आई-वडिलांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी बँकेतील पैसे काढण्यासाठी दोघे गावाकडे आले होते. या दिवशी प्रकाश हा वारंवार दारू पितो, त्यासाठी शेतजमिनीची वाटणी मागतो. या रागातून धोंडीरामने लाकडी ओंडक्याने प्रकाशला मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी धोंडीराम याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे तपास करीत आहेत.




























































