
हरयाणातील गुरुग्राममधील घटनेने हिंदुस्थानी क्रीडाविश्व चांगलेच हादरले आहे. राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली. कौटुंबिक वादातून झालेली ही हत्या आता चांगलीच चर्चेत आलेली आहे. मुख्य म्हणजे आता या हत्येसंदर्भात नवीन कारण समोर आलेले आहे. राधिकाच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राधिकाच्या वडिलांनी कबूल केले आहे की, त्यांनी राधिकाला स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना पाठीत 3 गोळ्या झाडल्या. तिच्या काकांनी तिला रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. असे सांगितले जात आहे की, टेनिस खेळताना राधिका यादवच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे तिला तिचा सराव थांबवावा लागला होता. तसेच तिने टेनिस पूर्णपणे सोडण्याऐवजी, टेनिस अकादमी उघडली होती. राधिकाचे वडील गावी गेल्यानंतर त्यांना मुलीच्या पैशावर जगतोय असा टोमणा मारला होता. यामुळेच त्यांनी रागाच्या भरात राधिकाची हत्या केल्याचे आता उघड झालेले आहे.
राधिकाला तिच्या वडिलांनी गोळ्या झाडल्यानंतर, ती जागीच कोसळली होती. गंभीर अवस्थेत तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यात अपयश आले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठीही पाठवण्यात आला. तसेच गुह्याची माहिती मिळताच गुरुग्राम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी पिता दीपक यादव याला अटक केली. राधिकावर गोळय़ा झाडण्यात आल्या तेव्हा तिची आईसुद्धा घरात होती, अशी माहिती आता समोर आली आहे.