नदालचे अपयशी पुनरागमन, सात महिन्यांनंतर टेनिस कोर्टवर उतरला

तब्बल सात महिन्यांनंतर टेनिस कोर्टवर उतरणाऱया रफाएल नदाल याला शनिवारी इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला. अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्त्झमन याने माजी नंबर वन टेनिसपटू रफाएल नदालचे आव्हान 6-2, 7-5 अशा फरकाने मोडून काढले आणि उपांत्य फेरीत धडक मारली.

27 सप्टेंबरपासून फ्रेंच ओपन स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या ग्रॅण्डस्लॅमची रंगीत तालीम म्हणून इटालियन ओपन स्पर्धेकडे बघितले जात आहे. रफाएल नदाल – डिएगो श्वार्त्झमन यांच्यामध्ये याआधी नऊ लढती पार पडल्या होत्या. डिएगो श्वार्त्झमन याला रफाएल नदालविरुद्ध एकही लढत जिंकता आलेली नव्हती. पण इटालियन ओपनमध्ये 15व्या रँकिंगवरील या खेळाडूने दमदार विजय मिळवला.

पराभव स्वीकारला

रफाएल नदालने या पराभवासाठी कोणतेही कारण पुढे केले नाही. कोरोना, लॉकडाऊन, सरावाचा अभाव यापैकी कोणतेही कारण पराभवाला जबाबदार असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले नाही. यावेळी तो म्हणाला, बऱयाच कालावधीनंतर टेनिसकोर्टवर उतरलो. सुरुवातीच्या दोन लढतींमध्ये चांगला खेळ झाला. उपांत्यपूर्व लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूने छान खेळ केला. माझ्याकडून चांगला खेळ झाला नाही हे मी मान्य करतो.

आपली प्रतिक्रिया द्या