राफेल नदाल इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये झोकात प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पेनचा स्टार टेनिसपटू आणि जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या राफेल नदाल ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये झोकात प्रवेश केला आहे. शुक्रवारी सातव्या क्रमांकाचा खेळाडू माटेओ बेरेटिनी याचा चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत नदालने पराभव केला आणि सहाव्यांदा ऑस्ट्रेलिया ओपनची फायनल गाठली.

क्वार्टर फायनलमध्ये संघर्षमय विजय मिळवलेल्या नदालने सेमीफायनलची सुरुवात दमदार केली. पहिले दोन सेट त्याने 6-3 आणि 6-2 असे नावावर केले. मात्र यानंतर माटेओ बेरेटिनी याने पुनरागमन करत तिसरा सेट 6-3 असा जिंकला. मात्र चौथ्या सेटमध्ये पुन्हा एकदा नदालने खेळ उंचावला आणि बेरेटिनी याला बॅकफूटवर ढकलले.

एक तास 25 मिनिटे रंगलेल्या या लढतीच्या चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू बरोबरीत होते. मात्र राफेल नदाल याने स्टार खेळाडूला साजेसा खेळ करत सेट 6-3 असा जिंकला आणि सामन्यावरही विजयी मोहोर उमटवली.

रविवारी फायनल

ऑस्ट्रेलिया ओपनची फायनल येत्या रविवारी रंगणार आहे. स्टेफानोस त्सित्सिसाप आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यातील विजेत्याची नदालचा सामना होईल. नदालने हा सामना जिंकल्यास तो रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांना मागे सोडत 21 ग्रँण्डस्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू बनेल.