कुरापतखोर चीनची ‘भिरभिरी’ उडणार! नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानात आणखी 3 ते 4 राफेल येणार

कुरापतखोर चीनची दाणादाण उडवण्यासाठी हिंदुस्थानी हवाई दलाने जोरदार तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच आणखी तीन ते चार राफेल विमाने फ्रान्समधून हिंदुस्थानात येणार आहेत. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांतच ही विमाने हवाई दलाच्या ताफ्यात दाखल केली जाणार आहेत. त्या दृष्टीने हरयाणाच्या अंबाला एअरबेसवर पूर्वतयारी केली जात आहे.

राफेलच्या पाच विमानांची पहिली बॅच 28 जुलैला हिंदुस्थानात दाखल झाली होती. पाचही विमाने सध्या लडाखच्या सीमेवर तैनात आहेत. त्यापाठोपाठ तीन ते चार राफेलची दुसरी बॅच दाखल होत आहे. त्यामुळे हवाई दलातील राफेलची संख्या आठ ते नऊ होणार आहे.

हवाई दलाचे पथक फ्रान्समध्ये
असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ (प्रोजेक्ट्स) एअर व्हाईस मार्शल एन. तिवारी यांच्या नेतृत्वाखालील हवाई दलाचे पथक फ्रान्समध्ये पोहोचले आहे. हे पथक नियमित वार्षिक बैठकीच्या निमित्ताने राफेल विमानांच्या प्रकल्पांचा आढावा घेणार आहे. सध्या हिंदुस्थानी वैमानिक फ्रान्समध्ये राफेल चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. मार्च 2021 पर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण होईल. त्यानंतर अंबाला आणि हाशिमारा एअरबेसवर प्रत्येकी एक स्क्वॉड्रन तैनात केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या