
इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली आहे. या तलवारीमुळे आपण इतिहासाशी जोडले गेलो आहे. मराठा साम्राज्याच्या खुणा, वस्तू आणि वारसा परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
श्रीमंत सेना साहिब सुभा श्री राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शन आणि लोकार्पण सोहळा प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
युनेस्कोचे 12 किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे, अशा विविध वारशांद्वारे आपण आपल्या इतिहासाशी पुन्हा जोडले जातो आहोत. हा दैदीप्यमान इतिहास पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचवण्याचे हे प्रयत्न खरोखर कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी श्रीमंत रघुजी राजे भोसले यांचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मराठय़ांचा दरारा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. किरण पुलकर्णी, मीनल जोगळेकर, डॉ. तेजस गर्गे व अन्य उपस्थित होते.
प्रेरणा देणारे प्रतीक
इंग्रजांच्या काळात लुटून नेलेल्या आपल्याच शौर्याच्या, पराक्रमाच्या, मराठा साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देणारी प्रथम रघुजी राजे भोसले यांची तलवार अखेर महाराष्ट्रात परत आली आहे. ही केवळ एक वस्तू नाही, तर आपल्या पिढय़ांना प्रेरणा देणारे स्वराज्याचे प्रतीक आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार म्हणाले.