
‘अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकार ‘हायर अॅक्ट’ लागू करण्याच्या विचारात असून हा कायदा लागू झाल्यास हिंदुस्थान मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकतो, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. एच-1 बी व्हिसा शुल्कातील वाढीमुळे बसलेल्या फटक्यापेक्षाही गंभीर आर्थिक परिणाम या कायद्यामुळे होऊ शकतात, अशी भीती राजन यांनी व्यक्त केली आहे.
‘डीकोडर’ या अमेरिकी थिंक टँकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘अमेरिकी काँग्रेसमध्ये सध्या हायर (HIRE) अॅक्टवर चर्चा सुरू आहे. देशाबाहेरील कर्मचाऱ्यांना काम देण्यापासून अमेरिकी कंपन्यांना परावृत्त करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. अमेरिकेबाहेरील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पेमेंटवर 25 टक्के कर लादण्याची तरतूद प्रस्तावित कायद्यात आहे. हा भुर्दंड अमेरिकी कंपन्यांना बसणार असला तरी त्याचा थेट फटका अंतिमतः कर्मचाऱ्यांना बसणार आहे. सेवा क्षेत्रालाही टॅरिफच्या कक्षेत आणण्याचा हा प्रयत्न आहे. वस्तूंवरील टॅरिफ हा आपल्यासाठी मोठा चिंतेचा विषय नाही. मात्र, सेवांवरही टॅरिफ लावले तर हिंदुस्थानसाठी ते संकट असेल, असे राजन म्हणाले.
            
		





































    
    






















