राहत इंदौरी सुपूर्द ए खाक

जनाजे पर मेरे लिखना यारो,
मोहब्बत करने काला जा रहा है…

अशी प्यार मोहब्बतची सप्तरंगी उधळण करणारे आणि तेवढय़ाच अधिकाराने तिखट शब्दांत कान टोचणारे शायर डॉ. राहत इंदौरी यांना इंदौर येथील छोटी खजरानी कब्रस्तानात सुपुर्द ए खाक करण्यात आले. रसिकमनावर राज्य करणाऱया या शायराला अखेरचा निरोप देण्यासाठी कब्रस्तानाच्या बाहेर मोठी गर्दी जमली होती. मात्र पोलिसांनी आवाहन केल्यानंतर हे चाहते निघून गेले.

मै जब मर जाऊं तो मेरी अलग पहेचान लिख देना
लहू से मेरी पेशानी पर हिंदुस्थान लिख देना…

अशा शब्दांत देशप्रेमाचा जयजयकार करणारे शायर डॉ. राहत इंदौरी यांचे मंगळकारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांना मधुमेह, हृदयविकारही होता. आपल्याला कोरोना झाल्याचे ट्विट करून त्यांनी चाहत्यांना रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. सायंकाळी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालकली. मंगळवारी रात्री 11 वाजता शहरातील छोटी खजरानी कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला. यावेळी कब्रस्तानाच्या बाहेर त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीचा अंदाज पाहून पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. पोलीस अधिकाऱयांनी आवाहन केल्यानंतर चाहत्यांनी गर्दी कमी केली.

ये बुढी कब्रें तुम्हे कुछ नहीं बताएंगी
मुझे तलाश करो दोस्तो यहीं हूँ मै…

अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बंडखोर मनाच्या या शायराला अखेरचा निरोप देण्यात आला. राहतभाईंची दोन मुले, त्यांचे काही निकटवर्तीय आणि रुग्णालयाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या