महाराष्ट्राची निवडणूक भाजप आणि आयोगाने मिळून ढापली, राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा हल्ला

‘भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग हे एकत्र मिळून काम करत आहेत. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या दोघांनी मिलीभगत करून ढापली. बिहार आणि आसाममध्येही हेच करण्याचा त्यांचा डाव आहे,’ असा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला.

आसाममध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. हे लोक बिहारमध्ये नवीन मतदार यादी तयार करत आहेत. लाखो लोकांना मतदार यादीतून वगळले जात आहे. निवडणूक आयोग आपली जबाबदारी पार पाडत नाही, तो फक्त भाजप नेत्यांचे ऐकतो. आम्ही निवडणूक आयोगाकडून अनेक वेळा मतदार यादी मागितली. पत्र लिहिले, पण काहीही मिळाले नाही. ते फक्त सबबी सांगतात, कामे करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

मी जे बोलतो, ते घडतं!

‘मी जे बोलतो, ते आणि तसेच घडते! कोविड काळातील अनागोंदी, नोटबंदी चुकीच्या जीएसटीच्या बाबतीत मी जे बोललो, ते खरे ठरले. आज मी हे सांगतो की आसामचे मुख्यमंत्री काही दिवसांनी तुरुंगात दिसतील. मोदी-शहासुद्धा त्यांना वाचवू शकणार नाहीत. हिमंत बिस्व सरमा हा माणूस स्वतःला राजा समजतो. लोकांवर ओरडतो, पण त्याच्या मनात भीती आहे. हा माणूस 24 तास आसामचे भूखंड चोरण्यात गुंतलेला असतो, असा घणाघात राहुल यांनी केला.