मोदी सरकार युवकांना गोळ्या घालत आहे; राहुल गांधी यांचा आरोप

411

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रतीमा मलीन केली आहे. देशात पूर्वी बंधुभावाचे वातावरण होते. मात्र, मोदी यांनी देशातील बंधुभाव आणि सौहार्द नष्ट केले आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. जयपूरमध्ये आयोजित युवा आक्रोश रॅलीत ते बोलत होते. केंद्र सरकारला सवाल करणाऱ्या युवकांना गोळ्या घालण्यात येत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. वाढती बेरोजगारी आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या मुद्दावरही त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

देशात हिंसचार वाढला आहे. सरकारकडूनच हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार देशात गुंतवणूक करण्यास घाबरत आहेत. जगात राजधानी दिल्लीची प्रतिमा रेप कॅपिटल झाली आहे, असेही ते म्हणाले. युवा आक्रोश रॅली देशातील युवकांसाठी करण्यात आली आहे. देशातील युवकांना देशाची परिस्थिती माहित आहे. देशाची सर्वात मोठी संपत्ती आजचे युवक आहेत. आम्ही युवकांच्या कौशल्याच्या जोरावर कोणत्याही देशावर मात करू शकतो, असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. देशाची हीच संपत्ती मोदी सरकार नष्ट करत आहेत. अनेक युवक आज रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. देशातील युवक मोदी सरकारला प्रश्न विचारत आहे. मात्र, सरकार त्यांना गोळ्या घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन धर्मात तेढ निर्माण करून मोदी सरकार हिंसाचार पसरवत आहे, हे देशातील जनता खपवून घेणार नाही, असा इशाराही राहुल यांनी दिला.

मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. सुमारे एक कोटी युवक बेरोजगार झाले आहेत. मोदी सरकारने दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी मोठीमोठी भाषणे करतात. अनेक फसवी आश्वासने देतात. सीएए,एनआरसी, एनपीआर याबाबत बोलतात. मात्र, वाढत्या बेरोजगारीबाबत ते काहीही बोलत नाही. युपीए सरकारच्या काळात देशाचा जीडीपी 9 टक्के होता. मोदी सरकारच्या काळात जीडीपी 5 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आमचे सरकार गरीबांचा पैसा गरीबांसाठीच खर्च करत होते. मोदी सरकार गरीबांचा पैसा उद्योगपतींना वाटत आहे, असा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी अर्थव्यवस्था समजून घेण्याची गरज आहे. गरीबांकडे पैसे येणार नाहीत, तर ते खर्च कसा करणार, याचा विचार सरकारने करावा,असे ते म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. मनरेगासारखी योजना अपयशी ठरत आहे. सरकार गब्बरसिंग टॅक्स लागू करून जनतेचा पैसा उकळत आहे आणि उद्योगपतींना देत आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळी आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या