शेतकऱ्याला साडेतीन रुपये देऊन टाळ्या वाजवून घेतल्या; राहुलचा मोदींवर पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi

सामना ऑनलाईन । पाटणा

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकऱ्यांना दिवसाला केवळ 17 रुपयेच सरकारने दिले आहेत. शेतकऱ्याला कुटुंबाला फक्त साडेतीन रुपये देऊन मोदींनी संसदेत टाळ्याही वाजवून घेतल्या, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पात सरकारने केलेल्या घोषणांवर टीका केली. सरकारच्या अर्थसंकल्पाने विरोधकांचे चेहरे पडले अशी टीका मोदी यांनी केली होती. त्यावर राहुल यांनी पलटवार केला. शेतकऱ्यांचा अपमान करून त्यांना फक्त साडेतीन रुपये देऊन मोदी टाळ्या वाजवून घेत आहेत, असे राहुल म्हणाले. मोदी श्रीमंतांना भरभरून देतात. मात्र, शेतकऱ्यांना मात्र त्यांनी फक्त साडेतीन रुपये दिले आहेत. बिहारमधील पाटणा येथे सुमारे 28 वर्षांनंतर झालेल्या काँग्रेसच्या सभेत ते बोलत होते.

काँग्रेसने या ऐतिहासिक सभेसाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. सुमारे 28 वर्षानंतर होत असलेली सभा काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. सभेच्या आयोजनाबाबत त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. बिहारमध्ये काँग्रेसची सत्ता येणार आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. यावेळी राजदच्या तेजस्वी यादव यांच्यासह महाआघाडीतील अनेक नेते सहभागी झाले होते. काँग्रेसची सत्ता आली तर पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. काँग्रेसचे सरकार आले तर प्रत्येक गरीब व्यक्तीला किमान वेतन मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

नोटाबंदी हा आतापर्यंतचा जगातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी आपल्या श्रीमंत मित्रांचा काळा पैसा सफेद केला. मोदींप्रमाणेच नितीशकुमारही मोठ मोठे वादे करतात. मात्र, त्यांनी कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदी आणि नितीश कुमारांवर निशाणा साधला. आम्ही मोदींसाऱखे राजकारण करीत नाही. आम्ही ठरवलं तर ऐतिहासिक काम करतो. मोदींनी पाच वर्षांत अरबपतींना करोडो रुपये दिले. श्रीमंतांसाठी त्यांच्याकडे पैशाची काहीच कमी नाही. मात्र, शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी मोदी सरकारकडे पैसे नाहीत.