
तुम्हाला जर खोटं ऐकायचं असेल तर आपला टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा. ते दिवसाचे 24 तास खोटं बोलतात, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
आसाममध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी वाढती बेकारी, सीएए, कृषी कायदा आदी मुद्दय़ांवरून थेट मोदींना टीकेचे लक्ष्य केले आहे. आसामच्या कामरूपमध्ये झालेल्या प्रचारसभेत ‘मी इथे तुमच्याशी खोटं बोलायला आलेलो नाही. कारण माझे नाव मोदी नाही. आसामविषयी, शेतकऱयांविषयी किंवा इतर कोणत्याही गोष्टींविषयी तुम्हाला जर खोटं ऐकायचं असेल तर तुम्ही टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा. ते पूर्ण 24 तास खोटं बोलतात’ असा टोला लगावला.
भाजपा रोजगार देण्याचा प्रयत्न करत नाही. युवकांना मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. उलट आसामवर आक्रमण करते. सीएए हा कायदा आसामवरचे आक्रमणच आहे. हा फक्त एक कायदा नाही. हा तुमचा इतिहास, भाषा आणि बंधुत्वावर हल्ला आहे. त्यामुळेच आम्ही त्याला विरोध करत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.























































