
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. बुधवारी (४ फेब्रुवारी २०२६) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार होते. मात्र पंतप्रधानांचे हे संबोधन पुढे ढकलण्यात आले. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधानांचे भाषण पुढे ढकलण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी X वर पोस्ट करत म्हटलं आहे की, “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच ते आज संसदेत आले नाहीत.” विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी पंतप्रधान पळ काढत असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला.
याच मुद्द्यावर बोलताना काँग्रेस खासदार प्रियनाक गांधी म्हणाल्या आहेत की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, म्हणून ते संसदेत आले नाहीत. त्यांचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार निष्कांत दुबे काँग्रेसच्या महिला खासदारांना पाहून बुलेट ट्रेनप्रमाणे पळाले.”
सोमवारी आणि मंगळवारी चिनी सैन्याने हिंदुस्थानात केलेल्या घुसखोरीवर बोलणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधाऱ्यांनी रोखलं होतं. यानंतर मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आजही संसदेत विरोधी पक्ष आक्रमक भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं. यातच पंतप्रधान मोदींचे संध्याकाळी ५ वाजता होणारे भाषण रद्द करण्यात आलं आहे.




























































