
काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अर्बन नक्षलवादी डिटेन्शन सेंटरबाबत अफवा पसरवताहेत, असा आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. आरएसएसच्या पंतप्रधानांनी भारतमातेशी प्रतारणा केलीय, असे घणाघाती उत्तर त्यांनी पंतप्रधान मोदींना दिले.
सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील संतप्त वातावरणाचे खापर विरोधकांवर फोडले होते. विरोधक खोटय़ा बातम्या पसरवत असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर राहुल यांनी गुरुवारी ट्विट केले. या ट्विटसोबत पंतप्रधानांच्या आरोपाची व्हिडीओ क्लिप जोडली. या क्लिपमध्ये आसाममध्ये बांधण्यात येत असलेले डिटेन्शन सेंटरही दाखवण्यात आले आहे. ‘झूठ, झूठ, झूठ’ असे हॅशटॅग करीत राहुल यांनी हे ट्विट केले.
आगीशी खेळू नका!
सुधारित नागरिकत्व कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने निदर्शने सुरूच राहतील. भाजपने आगीशी खेळू नये, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी दिला. भाजप दिलेली वचने पाळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मंगळुरूत पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांच्या कुटुंबियांना दिली जाणारी भरपाई रोखून धरणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या भूमिकेवर बॅनर्जींनी टीका केली.
























































