सिद्धू तीन दिवस वेटिंगवर, राहुल भेटलेच नाहीत, हात हलवत पंजाबला

781

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत तळ ठोकून बसलेल्या सिद्धू यांना राहुल यांनी वेटिंगवर ठेवले आहे. भेटीसाठीचा निरोप न आल्याने हात हलवत अखेर ते पुन्हा पंजाबला परतले.

नवज्योत सिद्धू यांनी या आधी 10 जून रोजी प्रियंका गांधी आणि अहमद पटेल यांच्या उपस्थितीत राहुल यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. त्यावेळी सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील दुरावा कमी करण्याच्या सूचना अहमद पटेल यांना करण्यात आल्या होत्या. त्यातच सिद्धू यांच्याकडे पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र त्यांनी त्यास नकार दिला. यासंदर्भात तसेच पंजाबमधील पक्षांतर्गत वादाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी दिल्लीला गेलेल्या सिद्धू यांना रिकाम्या हाती परतावे लागले आहे.

पक्षाध्यक्षांच्या मनात चाललंय काय?

वाढदिवसाच्या दिवशी राहुल गांधी पक्षाच्या मुख्यालयात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सर्वांकडून शुभेच्छाही स्वीकारल्या. त्यानंतर यूपीए आणि संसदीय समितीच्या बैठकीस त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे राहुल पुन्हा एकदा पक्षकार्यात सक्रिय होत असल्याची चर्चा होती, मात्र सिद्धू यांच्यासह इतर राज्यांतील नेत्यांना त्यांनी भेट नाकारल्याने पुन्हा एकदा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मनात काय चाललंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या