
संसद अधिवेशनाचा तिसरा दिवसही आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गाजवला. चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावर सत्ताधाऱ्यांनी लोकसभेत बोलू न दिल्याने राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे पुस्तकच संसदेत फडकवले. इतकेच नव्हे, त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर पुस्तकातील उताऱ्यांचे जाहीर वाचन केले. ‘‘मोदी संसदेत आल्यास मी त्यांना हे पुस्तक भेट देईन, पण ते येतील असे वाटत नाही. त्यांच्यात ती हिंमत नाही,’’ असा घणाघाती हल्ला राहुल यांनी चढवला.
ऑगस्ट 2020 मध्ये चिनी सैन्य हिंदुस्थानी हद्दीत घुसत असताना मोदी सरकारने कशी बोटचेपी भूमिका घेतली होती, लष्कराला कसे एकटे पाडले होते, याचे सत्य नरवणे यांनी ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या त्यांच्या पुस्तकात मांडले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल यांनी या पुस्तकाच्या आधारे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. कोण देशभक्त आहे आणि कोण नाही हे कळेल असे ते म्हणाले. मात्र सत्ताधाऱ्यांनी त्यांना सलग दोन दिवस बोलू दिले नाही. असे पुठले पुस्तक प्रकाशितच झाले नसल्याने त्याचा आधार घेऊन बोलता येणार नाही, असा युक्तिवाद संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता.
मोदींनी जबाबदारी पार पाडली नाही!
राहुल गांधी यांनी आज हे पुस्तक संसदेत आणून सरकारची गोची केली. पत्रकारांसमोर हे पुस्तक झळकावत त्यांनी सरकारवर तोफ डागली. ‘‘सरकार म्हणते असे पुस्तक अस्तित्वातच नाही, पण हे पुस्तक आहे हे देशातील प्रत्येक तरुणाला कळले पाहिजे. माजी लष्करप्रमुखांनी हे पुस्तक लिहिले आहे. मला ते वाचू दिले जात नाही. लडाखमध्ये चिनी सैन्य चालून आले असताना नेमके काय झाले हे त्यांनी लिहिले आहे. त्या वेळी सरकारने त्यांना दोन तास वाट पाहायला लावली. दोन तासांनी प्रतिसाद दिला खरा, पण सगळा निर्णय लष्करावर ढकलून दिला. मोदींनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही हे यातून सिद्ध झाले आहे,’’ असे राहुल म्हणाले.
नरेंदर हो गया सरेंडर! युवक काँग्रेसचे आंदोलन
चीन प्रश्नी मोदी सरकारचा गलथानपणा आणि लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस कार्यालय परिसरात आंदोलन केले. या वेळी ‘नरेंदर सरेंडर हो गया’ अशा घोषणा देण्यात आल्या.































































