लालूंची राहुलसाठी मटण पार्टी, काँग्रेसने एक्स अकाऊंटवरून शेअर केला व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची पाककलेची अनोखी बाजू काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी जगासमोर आणली आहे. लालू यांच्या घरी भेट दिल्यानंतर लालू यांनी राहुल गांधी यांच्यासाठी खास चंपारण मटण पार्टीचा बेत आखला. या मटण पार्टीसोबतच लालू यांनी कुठे अन्याय होताना दिसला तर अखंड लढा देणे हाच आपला राजकीय मसाला असल्याचेही सांगितले. या मटण पार्टीचा व्हिडीओ काँग्रेसने एक्स अकाऊंटवरून शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.

लालू यादव हे लोकप्रिय राजकारणी असले तरी त्यांच्यातील पाककला अनेकांना माहीत नाही. त्यात ते चॅम्पियन आहेत. ते बरे झाल्यानंतर त्यांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांच्याकडून त्यांची सिव्रेट रेसिपी का शिकू नये असे मनात आले आणि त्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी माझे स्वागत करून प्रेमाने चंपारण मटण बनवायला शिकवल्याचे राहुल व्हिडीओत सांगताना दिसत आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूंचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव तसेच मोठी मुलगी मिसा भारतीही यावेळी उपस्थित होते.

राजकीय मसाला म्हणजे काय?

राजकीय मसाला म्हणजे काय? असे राहुल यांनी विचारले असता राजकीय मसाला म्हणजे संघर्ष. कुठेही अन्याय दिसला तर मग त्याविरुद्ध लढा, असे लालू यांनी सांगितले. मिसा भारती यांनी मटण वाढल्यानंतर राहुल म्हणाले, माझ्या बहिणीने मला तिच्यासाठी काही आणायला सांगितले आहे. ते तिच्यासाठी नेले नाही तर मोठी समस्या होईल. त्यांचा रोख मटणाकडे होता.


मिक्सिंगशिवाय राजकारण अशक्य

चंपारण मटणाचा आस्वाद घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी गप्पा मारताना मटणासाठी विविध प्रकारचे मसाले वापरले. राजकारण आणि मसाले यांची तुलना कशी कराल, यावर मिक्सिंगशिवाय राजकारण अशक्य असल्याचे लालू सांगताना दिसत आहेत.

दरम्यान, लोकांचा ब्रेन वॉश करतात. सध्या गुरगाव, नूंहमध्ये जे झाले त्यामुळे शाळा-कॉलेजांपासून सर्व बंद असल्याचे सांगतानाच पॉझिटिव्ह पॉलिटिक्स झाले पाहिजे, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.

व्हिडीओत नेमके काय?

या व्हिडीओमध्ये हे मटण बिहारमधून आणल्याचे लालू सांगताना दिसत आहेत. तसेच लालू यादव यांच्या सांगण्यानुसार राहुल मटण बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि खास मसाला वापरत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. किती चमचे मसाला घालू, आता कुठला मसाला घालू असे विचारताना दिसत आहेत. दरम्यान, स्वयंपाकासोबतच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

म्हणून भाजप द्वेष पसरवतोय

भाजपावाले जो द्वेष पसरवत आहेत त्याचे कारण काय आहे, असे राहुल यांनी विचारले असता भाजपाची राजकीय भूक जी आहे ती कधीच मिटत नाही, असे उत्तर लालू यांनी दिले. यावर जेव्हा आर्थिक व्यवस्था चांगली असते तेव्हा द्वेष कमी होतो आणि आर्थिक व्यवस्था जेव्हा खराब असते तेव्हा द्वेष वाढतच जातो. सध्या हीच स्थिती आहे, याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले. तुमच्याकडून नव्या पिढीने काय शिकावे, असे विचारले असता जुन्या पिढीने जो इतिहास घडवला आहे तो कदापि विसरता कामा नये, असे उत्तर त्यांनी दिले.