आता न्याय होईल; राहुल गांधी यांचे अलवार बलात्कार पीडितेला आश्वासन

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानातील अलवार सामुहिक बलात्कार पीडितेची आणि तिच्या कुटुंबीयांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी भेट घेतली. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून पीडितेला न्याय दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेचे गंभीरतेने पालन करण्यात येईल असे ते म्हणाले. अशा गंभीर घटनांचे आम्ही भाजपसारखे राजकारण करत नाही. आम्ही हे प्रकरण गंभीरतेने हाताळून दोषींवर कारवाई करू असे ते म्हणाले.

हा मुद्दा अतिशय गंभीर असून याचे राजकारण करण्यात येऊ नये. हा मुद्दा आमच्यासाठी राजकीय नसून भावनात्मक आहे. आपण राजकारण करण्यासाठी येथे आलेलो नाही, तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे पीडितेची भेट घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पीडितेला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. पीडितेच्या कुटुंबीयांनी न्याय मिळण्याची मागणी केली आहे. त्यांना आता न्याय मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.आम्ही भाजपसारखे राजकारण करत नसून हा आमच्यासाठी गंभीर आणि भावनात्मक मुद्दा आहे, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी कटुंबातील सदस्याप्रमाणे आमची भेट घेतली. त्यांनी घटनेबाबत माहिती घेऊन आमची समस्या जाणून घेतली. आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दिले आहेत, असे पीडितेने सांगितले. राहुल गांधी, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्याविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचेही महिलेने स्पष्ट केले आहे. राहुल गांधी बुधवारी पीडितेची भेट घेणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचा अलवार दौरा रद्द करण्यात आला होता.

या निवडणुकीत अलवार सामुहिक बलात्काराचा मुद्दा सातत्याने उपस्थित करून राजस्थानातील काँग्रेस सरकारवर टीका करण्यात येत आहे. अलवारमध्ये 26 एप्रिलला 19 वर्षांच्या एका दलित महिलेवर तिच्या नवऱ्याच्यासमोर महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींपैकी एकाने घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. त्यानंतर पोलीस आणि राजस्थान सरकारवर टीका होत आहे.