
सरकार लाभाचे खासगीकरण आणि नुकसानीचे राष्ट्रीयीकरण करत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना कॉर्पोरेट्सना विकणे आणि खासगीकरण करणे म्हणजे देशाच्या आर्थिक सुरक्षेसोबत तडजोड करण्यासारखे असल्याचा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लगावला आहे.
बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी बँक कर्मचाऱयांच्या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, राज्यसभेतही विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्दय़ावरून प्रश्न उपस्थित करत राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाला विरोध केला आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांमुळेच अर्थव्यवस्था तगली
देशात जवळपास 12 राष्ट्रीयीकृत बँका असून लाखभर शाखा आहेत. यामध्ये 13 लाख लोक काम करतात आणि 75 कोटींहून अधिक खातेदार आहेत. यातील कुणालाही न विचारता सरकारने खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. 2008 मध्ये जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट आलेले तेव्हा राष्ट्रीयीकृत बँकांमुळेच अर्थव्यवस्था तगली होती, असे खरगे म्हणाले.

























































