धनखड का लपले? बोलत का नाहीत? राहुल गांधी यांचा सवाल

राज्यसभेत जोरजोरात बोलणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक ‘खामोश’ का झाले आहेत, एक शब्दही का बोलत नाहीत. ते का लपून बसलेत, असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला.

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा विरोधी पक्षांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी धनखड यांच्याविषयी भाष्य केले. ‘धनखड यांच्या राजीनाम्यामागे एक कथा आहे. काही लोकांना ती माहीत असेल, काहींना माहीत नसेल. आता त्यांच्या गायब होण्याची नवी कहाणी सुरू झाली आहे. हिंदुस्थानात अशी काय परिस्थिती निर्माण झाली आहे की माजी उपराष्ट्रपती एक शब्दही बोलू शकत नाहीत? त्यांना लपून का राहावे लागत आहे? आपण नेमके कोणत्या काळात जगत आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

संसदीय प्रथा पुनरुज्जीवित करण्याची संधी – खरगे

विरोधी पक्षाला आदर मिळत होता, त्या परंपरा मोडल्या जात आहेत. अशा वेळी संपूर्ण आयुष्य लोकशाही मूल्यांना वाहिलेल्या एका माजी न्यायाधीशाला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. सुदर्शन रेड्डींना निवडून देऊन संविधान आणि लोकशाहीची सर्वोच्च परंपरा पुन्हा प्रस्थापित करूया, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. रेड्डी यांच्या सत्काराप्रसंगी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत सपा नेते रामगोपाल यादव, डीएमकेचे थिरुची सिवा उपस्थित होते.

मतचोरीविरुद्ध वणवा पेटलाय

‘मतचोरीच्या विरोधातील वणवा बिहारमध्ये मोठय़ा प्रमाणावर पसरला आहे. तो आता रोखता येणार नाही. या देशाचा आत्माच असा आहे की येथील लोक प्रत्येक गोष्ट लगेच समजतात. बिहारमध्ये लहान मुलांच्या तोंडातही ‘व्होट चोरी’ हा शब्द आहे. हे आता थांबणार नाही,’ असा इशारा राहुल यांनी दिला.