
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी केरळ आणि तामिळनाडूच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांनी वायनाडमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी राहुल गांधी यांनी स्वतः ट्रॅक्टर चालविला. यावेळी अनेक काँग्रेस नेते त्यांच्यासोबत ट्रॅक्टरवर होते. या रॅलीत राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर कडाडून टीका केली.
शक्तीशाली लोकांचे सशक्तीकरण करणे, ही भाजपची विचारधारा आहे. तर दुर्बलांचे सशक्तीकरण ही काँग्रेसची विचारधारा आहे, असे राहुल गांधी म्हणाले. देशाच्या विकासासाठी सर्वांना एकत्र घेत वाटचाल करण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनरेगा योजनेवरूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.
मनरेगा योजनेत काहीही नाही, असे पंतप्रधान सांगत होते. मात्र, कोरोना महामारीच्या काळात ही योजना वरदान सिद्ध झाली. पंतप्रधानांनी या योजनेसाठी निधी वाढवावा लागला. युपीए सरकारच्या काळात मनरेगा योजनेमुळे विकास झाला. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेत पैसा आला असे त्यांनी सांगितले.





























































