
रायबरेलीतील कामांना निधी देण्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि योगी सरकारच्या मंत्र्यांत चांगलीच खडाजंगी झाली. मी दिशा बैठकीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मला विचारून चर्चा व्हायला हवी, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. यावर उत्तर प्रदेशचे फलोत्पादन व पृषी निर्यात राज्यमंत्री दिनेश सिंह यांनी ‘तुम्ही लोकसभेत अध्यक्षांचं ऐकत नाही. मग इथे आम्ही तुमचं का ऐकावं?’ असे त्यांना सुनावले, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राहुल गांधी हे सध्या त्यांच्या रायबरेली मतदारसंघाचा दौरा करत आहेत. शुक्रवारी रायबरेलीत ‘दिशा’ बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीवेळी मंत्री दिनेश सिंह यांनी असे काही मुद्दे मांडले, ज्याबद्दल बैठकीतील इतर सदस्यांना कल्पना देण्यात आली नव्हती. त्यावरून राहुल गांधी आणि दिनेश सिंह यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी व दिनेश सिंह यांच्यात तू-तू, मैं-मैं चालू असल्याचं पाहायला मिळत आहे.
मंत्री दिनेश प्रताप सिंह कोण?
मंत्री दिनेश प्रताप सिंह हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाच्या तिकिटावर त्यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवली होती. 2024 मध्ये देखील त्यांनी निवडणूक लढवली होती. राहुल गांधी यांनी त्यांचा 3.90 लाख मतांनी पराभव केला. त्यानंतर भाजपाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. त्यांच्याकडे फलोत्पादन, पृषी निर्यात, परदेशी व्यापार राज्यमंत्रिपद (स्वतंत्र कार्यभार) आहे.