
>>राहुल गोखले
संतसाहित्याचे अभ्यासक आणि निरुपणकार दिवंगत डॉ. रामचंद्र देखणे यांचे ‘चैतन्य पालवी’ हे पुस्तक म्हणजे मर्यादित पण नेमक्या आणि चपखल शब्दांच्या योजनेतून घडवलेली आशययात्रा आहे असेच म्हटले पाहिजे. डॉ. देखणे यांचे बहुधा हे अखेरचे पुस्तक असावे. पाच भागांत विभागलेले हे छोटेखानी लेख म्हणजे अनेक संदर्भ, सुभाषिते, ओव्या, अभंग, दाखले, कथा यांची पखरण असलेली चिंतनेच आहेत.
पुस्तकात ‘साहित्य चिंतन आणि अभिव्यक्ती’; ‘सद्गुणांची सुंदरता’; ‘लोकजीवन आणि लोकसंस्कृती’; ‘संत आणि सद्विचारदर्शन’ आणि ‘जीवनानंदाची वारी’ असे पाच विभाग आहेत. त्या अनुषंगाने लेखांची विभागणी करण्यात आली आहे. या लेखांतून लेखक कधी वाचकाला कधी वसंत ऋतूच्या संस्कृत वाङ्मलयातील उल्लेखांची ओळख करून देतो; कधी कालिदास, शेक्सपियर आणि इटालियन कवी व्हर्जिल यांच्यातील साम्यस्थळे शोधतो; कधी श्रीहर्षाच्या महाकाव्याचा उल्लेख करतो; तर कधी प्रज्ञा- प्रतिभा प्रश्नोत्तरांचा अनुभव देतो. ‘सद्गुणांची सुंदरता’ या विभागात सत्य, नैतिकता, विश्वास, श्रद्धा, त्याग, दातृत्व, विवेक, आदींचा मागोवा लेखकाने संतसाहित्याचा अंगाने घेतला आहे.
‘लोकजीवन आणि लोकसंस्कृती’ या तिस्रया विभागात प्रामुख्याने वारीचे निरनिराळे लोभस पैलू, कीर्तनाची परंपरा, गावगाडय़ातील लोकरंग, वासुदेव, बहुरूपी, इत्यादींचा वेध लेखकाने घेतला आहे. चौथ्या भागात लेखकाने संतसाहित्याची व्यापकता आणि वैशिष्टय़े उलगडून दाखविली आहेत. लेखकाने दिलेले संदर्भ हे हजारो वर्षांपूर्वीच्या वाङ्मयातील आहेत तसेच अगदी विंदा करंदीकरांसारख्या अलीकडच्या काळातील कवींचेही आहेत. या ही चिंतने वाचकाला वाचनानंद देतीलच; पण चैतन्याचा अनुभवही देतील.





























































