राहुरी येथील बिबट्या वनविभागाने लावलेल्या जाळ्यात जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली बंगला शिवारात सातत्याने दर्शन देणारा बिबट्या अखेरीस वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

देवळाली बंगला परिसरातील डावखर वस्ती परिसरात असलेल्या धनराज कदम यांच्या शेतात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी शुक्रवारी दुपारी लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास हा बिबट्या अडकला. सकाळी परिसरातील शेतकऱ्यांना ही घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.

वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. रायकर, वनरक्षक एस. एस. जाधव, एम. एन. गाडेकर, एस. एस. चव्हाण, एस. बी. खेमनर, वनरक्षक आर. आर. घुगे, वन कर्मचारी प्रदीप कोहकडे, महादेव शेळके, बाबासाहेब सिनारे, ताराचंद गायकवाड यांनी सदर बिबट्या मादी ताब्यात घेऊन बारागावनांदूर रोपवाटिका येथे नेण्यात आली.

दरम्यान घटनास्थळी माजी आ. चंद्रशेखर कदम व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी धाव घेऊन वन विभाग व अधिकारी यांच्याशी चर्चा करून ज्या ज्या भागात सातत्याने बिबट्याचे दर्शन होते. त्या त्या ठिकाणी पिंजरे लावण्या बाबत सूचना केल्या. यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके, शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, रवींद्र कदम, युवराज कदम, धनराज कदम, गणेश सिनारे, तुषार कदम, राजेंद्र सिनारे, रामप्रसाद कदम, राज मुसमाडे, बाळासाहेब कदम, सौरभ शिंदे, संदीप कदम, आदी उपस्थित होते.