
राहुरी फॅक्टरी येथे तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांच्या आंदोलनस्थळी मंगळवारी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अरुण तनपुरे यांनी भेट दिली. त्यांच्यासमोर आंदोलनकर्ते मागण्यांचा उहापोह करीत असतांना अचानक पाच-सहा ऊस तोडणी मुकादमांनी आंदोलनाच्या मंडपात प्रवेश केला. ‘आमचेही लाखो रुपये बुडवले’ असे सांगून संतप्त भावना व्यक्त केल्या. आमच्या घामाचे दाम दिले नाही तर खासदार सुजय विखे यांच्या समोर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा ऊस तोडणी मुकादमांनी दिला आहे.
जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी तनपुरे साखर कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. बँकेचे जेष्ठ संचालक तनपुरे यांनी बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सरव्यवस्थापक नंदकुमार पाटील यांच्या समवेत कारखान्याच्या आत जाऊन पाहणी केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलनास बसलेल्या कामगारांच्या भावना व मागण्या समजून घेतल्या. कामगार युनियनचे उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, कामगार नेते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, बाळासाहेब तारडे, सिताराम नालकर यांनी “जिल्हा बँकेने कारखाना चालविण्यास देण्याची निविदा प्रक्रिया राबवताना कामगारांचे थकीत वेतन व इतर सुमारे 125 कोटींच्या थकबाकीचा अंतर्भाव करावा.” अशी मागणी केली. त्यावर बोलतांना बँकेचे प्राधिकृत अधिकारी पाटील म्हणाले, “कामगारांसह सर्व प्रकारच्या थकीत देण्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.” ही चर्चा सुरु असतानाच कामगार आंदोलनाच्या मंडपात चार ते पाच जण घुसले आणि आमचे पैसे कोण देणार असा सवाल करु लागले.
यावेळी ऊस तोडणी मुकादम किसनदेव महादेव बडे (रा. लोणी, शिरुर कासार, जि. बीड) यांच्यासह पाच-सहा मुकादमानी आंदोलकांच्या व तनपुरे यांच्यासमोर मागील संचालक मंडळाने केलेल्या फसवणुकीचा पाढा वाचला. “खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विश्वासावर उचल न घेता ऊस तोडणी मजूर पुरविले. दोन वर्षांपासून आमचे 15 लाख रुपये थकविले आहेत. आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही.” अशा संतप्त भावना बडे यांनी व्यक्त केल्या. आमचे घामाचे दाम मिळाले नाही तर खा.सुजय विखे यांचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आम्ही सर्व मुकादम त्यांच्या समोर पेट्रोल ओतुन आत्मदहन करु, असे बडे यांनी सांगितले.




























































