कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर, कार्यालय आणि कोळसा डेपोंवर आयकर विभागाचे छापे

74

सामना प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील बड्या कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर, कार्यालय आणि कोळसा डेपोंवर आयकर विभागाने गुरुवारी छापे घातले. शेकडो कोटींच्या कोळसा चोरीप्रकरणी हे छापे टाकण्यात आले. या मोठ्या कारवाईमुळं कोळसा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षांत कोळसा चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. भद्रावतीलगत एका खासगी कोळसा खाणीतील कोट्यवधींचा कोळसाही चोरण्यात आला. जिल्ह्यातील बहुतांशी खाणीतून राजरोसपणे कोळशाची चोरी केली जात होती. ही चोरी व्यवसायाच्या गोंडस नावाखाली केली जात होती. या चोरीला आणि चोरांना राजकीय पाठबळ असल्यानं कारवाई होत नव्हती. पण अलीकडच्या काळात काही व्यावसायिकांनी चोरीचा अतिरेक केल्याचं दिसून आलं. याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आयकर विभागाच्या आठ-नऊ पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे घातले. यामध्ये चंद्रपुरातील प्रमुख कोळसा व्यवसायी शाम मित्तल, रणजित छाबडा, नितीन उपरे, संदीप अग्रवाल यांचा समावेश आहे. या चौघांच्याही घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. यासोबतच नागाळा येथील कोळसा डेपो आणि ताडाळी येथील विमला रेल्वे सायडिंगवरही छापा घालण्यात आला. या सर्व ठिकाणी झडती घेतली जात असून चौकशी सुरू आहे. या कारवाईसाठी सुमारे 80 ते 90 जणांची चमू इथे दाखल झाली असून, स्वतंत्र पथकं तयार करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. झटपट पैसा कमावण्यासाठी कोळसा व्यवसाय केला जातो. पण गैरमार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न अधिक होतो. असा गैरप्रकार करणाऱ्या व्यापाऱ्यांचीं एक टोळीच चंद्रपुरात सक्रिय झाली आहे. त्यातील बडे मासे आज गळाला लागले. या लोकांना आजवर राजकीय पाठबळ मिळत असल्यानं हा काळा धंदा जोरात सुरू होता. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरातील कोळसा चोरांचे धाबे दणाणले असून, चौकशी योग्यरीत्या झाल्यास आणखी बरीच प्रतिष्ठित नावं समोर येण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या