नालासोपाऱ्यात मेफेड्रिन ड्रग्ज कारखान्यावर छापा; नायजेरियन महिलेला अटक, साडेपाच कोटींचा मुद्देमाल जप्त

नालासोपाऱ्यात दिवसेंदिवस नशेचे अड्डे वाढत चालले असून तुळींज पोलिसांनी प्रगतीनगरमधील अंशीत प्लाझा येथील एका घरावर छापा टाकला. या छाप्यात 5 कोटी 60 लाख रुपये किमतीचे मेफेड्रिन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. हा कारखाना चालवणारी एक नायजेरियन महिला असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. नशेचा कारखाना थाटणारा मुख्य सूत्रधार व या महिलेचा प्रियकर फरार झाला आहे. तरुण पिढीला नशेच्या आहारी घेऊन जाणारे अनेक अड्डे असून ते उद्ध्वस्त करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.

नालासोपाऱ्यातील प्रगतीनगर या भागात अंशीत प्लाझा नावाची इमारत असून येथील रूम नंबर 405 मध्ये घरातच ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल फड यांच्या पुढाकाराने विशेष पथकाने शुक्रवारी संध्याकाळी अचानक धाड टाकली. त्यामुळे घरातील लोकांची पळापळ झाली. हा गोरखधंदा करणारी रिताफाटी कुरेबेवेई या नायजेरियन महिलेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. तिला ताब्यात घेतले असून या रॅकेटमध्ये आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. छापा पडताच तिचा प्रियकर पसार झाला असला तरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

‘त्या’ महिलेकडे अधिकृत व्हिसाही नाही
मेफेड्रिन ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त करताना पोलिसांना रिताफाटी कुरेबेवेई ही महिला सापडली. तिला तातडीने अटक करण्यात आली असून तिच्याकडे हिंदुस्थानात राहण्याचा अधिकृत व्हिसा नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिच्या अन्य नायजेरियन साथीदारांचाही शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील नालासोपारा म्हणजे ड्रग्जचा हॉटस्पॉट बनला आहे. या धंद्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांसह नायजेरियन नागरिकदेखील असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी घरातील कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात मेफेड्रिनसाठी लागणारा कच्चा माल व अन्य साहित्य ताब्यात घेतले असून घर भाड्याने देणाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. नालासोपारा परिसरात गेल्या काही वर्षांपासून नायजेरियन नागरिकांची संख्या वाढली असून ते बेकायदेशीरपणे या भागात राहतात. तसेच नशेचा व्यापार करून तरुण पिढीला बरबाद करीत असल्याचे दिसून आले आहे.