
क्यार आणि महा वादळांच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील 40 हजार 109 शेतकऱ्यांना 11 कोटी 06 लाख 47 हजार 321 रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 97 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी तसेच क्यार आणि महा वादळामुळे जिल्ह्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले होते. जवळपास 26 हजार हेक्टरवरील भातपिक नष्ट झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी शासनाकडे केली होती.
रायगड जिल्ह्यात 1 लाख 15 हजार 965 हेक्टर येवढे खरीपाचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा 95 हजार 666 हेक्टरवर यंदा भात पिकाची लागवड करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा यातील 26 हजार 624 हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसला. यात कापणी पश्चात 8 हजार 872 हेक्टरवरील तर 13 हजार 805 हेक्टरवरील व इतर पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 18 कोटी 10 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 11 कोटी 30 लाख 40 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी 11 कोटी 06 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. अद्याप 24 लाख रुपयांची मदत वाटप होणे बाकी आहे. यात प्रामुख्याने पेण, खालापूर, उरण आणि महाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. पेण तालुका वगळता उर्वरीत सर्व तालुक्यात शेतकऱ्यांना मदत वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
रायगड जिल्ह्यातील 40 हजार 109 शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. यात अलिबागमधील 4 हजार 008, पेणमधील 4 हजार 173, मुरुडमधील 1 हजार 754, पनवेलमधील 1 हजार 238, उरणमधील 583, कर्जतयेथील 4 हजार 205, खालापूरमधील 2 हजार 506, माणगाव 4 हजार 343 तळा 1 हजार 243, रोहा 5 हजार 790, सुधागड 2 हजार 411, महाड 3 हजार 759, म्हसळा 922, श्रीवर्धन 939 आणि पोलादपूर 2 हजार 235 शेतकऱ्यांचा समावेश आहे. उर्वरीत काम येत्या चार दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे.






















































