
माथेरानमधील 54 श्रमिक हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा परवाना न मिळाल्यामुळे ई-रिक्षाचालक उद्यापासून बेमुदत संपावर जात आहेत. त्याचा फटका माथेरानमध्ये येणाऱ्या शेकडो पर्यटकांना आणि दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे.
हातरिक्षा ही अमानवी प्रथा बंद करून सर्व चालकांना ई-रिक्षा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र अलिबाग येथे झालेल्या बैठकीत 94 हातरिक्षाधारकांपैकी 20 जणांना ई-रिक्षासाठी परवानगी देण्यात आली. उर्वरित 54 चालक आजही हातरिक्षा ओढत असून त्यांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता कायम असल्याचा आरोप करत रिक्षाचालक मालक सेवा संस्थेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या संपामुळे शालेय विद्यार्थी, दहावीतील परीक्षार्थी व पर्यटकांचे चांगलेच हाल होणार आहेत. दरम्यान पालकांनी किमान विद्यार्थ्यांसाठी सेवा सुरू ठेवण्याची विनंती संघटनेकडे केली आहे. मात्र संघटनेने चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन देत बंद कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे. आता प्रशासन आणि सनियंत्रण समिती यावर काय भूमिका घेणार याकडे माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.

























































