
माणगाव तालुक्यात मुंबई-गोवा हायवे बायपासचे काम ग्रामस्थांसाठी धोक्याचे ठरत आहे. दगड खाणीतील ब्लास्टिंगमुळे आजूबाजूच्या गावातील घरांना तडे जाण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत तक्रार करूनही प्रशासन आणि खाणमालक लक्ष देत नसल्याने माणगावच्या नाणोरे, खर्डीतील संतप्त गावकऱ्यांनी ठेकेदाराला चांगलेच चोपले.
मुंबई-गोवा हायवे रोडचे इंदापूर बायपास ते माणगाव बायपासचे काम जयभारत (एल. एन. ए. इन्फा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड) कंपनी करत आहे. या कंपनीची दगड उत्खनन खाण दाखणे ग्रामपंचायत हद्दीतील खर्डी बुद्रुक व नाणोरे गावाच्या वेशीवर आहे. कंपनीकडून होणाऱ्या दगड ब्लास्टिंगमुळे गावातील घरांना तडे जात आहेत. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी सुरुंग स्फोटानंतर नाणोरे व खर्डी गावात जोरदार धक्के बसले. यावेळी ग्रामस्थांनी दगड खाणीकडे धाव घेऊन काम बंद करण्याची मागणी केली. मात्र कमानीच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांनाच दमदाटी केली. यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी कर्मचारी पवनकुमार खिचड याला मारहाण केली. याप्रकरणी योगेश लाड व त्याच्या सोबत 9 ते 10 अनोळखी व्यक्तींविरोधात माणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
आरोग्यावर परिणाम
जयभारत कंपनी रात्री अपरात्री कधीही ब्लास्टिंग करते. यामुळे जमिनीला हादरे बसून घरांचे नुकसान होत आहे. अनेक घरांची कौले आणि पत्रे फुटले आहेत, भिंतींना तडे गेले आहेत. काही ग्रामस्थांच्या इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचेदेखील नुकसान झाले आहे. ब्लास्टिंगमुळे खर्डी बुद्रुक, नाणोरे गावातील लहान मुलांच्या आरोग्यावरदेखील घातक परिणाम होत आहेत. याबाबत खर्डी बुद्रुक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार करूनही कंपनीवर कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

























































