
गेल्या 14 महिन्यांपासून रखडलेल्या एकदरा पुलाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. थकीत बिलाची रक्कम लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर ठेकेदाराने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा पूल रहदारीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूककोंडी फुटून मुरुड, जंजिरा, एकदरा, माझेरी, राजपुरी, खोरा, डोंगरी गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
एकदरा पूल धोकादायक झाल्याने 2024 मध्ये पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळाली. त्याकरिता राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 4 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. या कामाचा ठेका ठाण्यातील संरचना कंपनीला देण्यात आला होता. मात्र 20 जानेवारी 2024 मध्ये सुरू झालेले काम 20 ऑक्टोबर 2024 मध्ये पूर्णपणे बंद झाले. ठेकेदार कंपनीला थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने पुलाचे काम थांबवण्यात आले होते.
रंगरंगोटीचे काम
प्रशासनाकडून या ठेकेदाराला लवकरच थकीत बिलासह सर्व रक्कम दिली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर 14 महिन्यांपासून बंद असलेल्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. या पुलाच्या दुरुस्तीचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून पुलाचे जॉईंट आणि रंगरंगोटीचे काम सुरू असल्याची माहिती संरचना कंपनीचे कामगार परमेश्वर उरांव, तिजेश्वर उरांव व बुधवार उरांव यांनी दिली.



























































