पालघर, रायगडला वायू‘बाधा’, लगतच्या गावांना सतर्कतेचे आदेश

1

सामना प्रतिनिधी । पालघर

लक्षद्वीप बेटाजवळ आलेल्या ‘वायू’ चक्रीवादळाची पालघर व रायगड किनारपट्टीला ‘बाधा’ झाली आहे. घोंघावणाऱया वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले असून झाडे जमीनदोस्त झाली. मुरुडच्या खोरा-बंदरात तर लाटांचे तांडव उसळले असून तब्बल 20 फूट उंचीच्या लाटा जेटीवर धडकत होत्या. वादळाचा जोर एवढा जबरदस्त होता की, बोर्डी स्थानकाजवळ रेल्वे पुलाचा गर्डरही झुकला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चारजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेची अप व डाऊन मार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प होती. समुद्रकिनाऱयालगतच्या सर्व गावांना हाय अलर्ट जारी केला असून दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान किनारपट्टीजवळील काही घरांतील माणसांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून कुणीही समुद्रकिनाऱयाकडे फिरकू नये तसेच कारणाशिवाय घराबाहेरदेखील पडू नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

रायगड व पालघर जिह्याला मोठा समुद्रकिनारा लाभला असून वायू चक्रीवादळाच्या भीतीने घबराट उडाली आहे. आज सकाळपासूनच चर्चा सुरू होती ती वादळाचीच. विजेचा लपंडाव सुरू असतानाच आज दुपारपासून मुरुडच्या खोरा-बंदरात लाटांचे रौद्ररूप दिसून आले. त्यामुळे मुरुडकर धास्तावले असून जंजिरा किल्ल्याच्या बुरुजांपर्यंत लाटा उसळत होत्या. सर्व बोटी आगरदांडा खाडीत सुरक्षित असल्या तरी लाटांच्या तडाख्यामुळे काही बोटींचे नुकसान झाले.

– अलिबाग, मुरुड तर डहाणू पालघरच्या समुद्रकिनाऱयावरील अनेक झाडे वादळ आणि पाऊस यामुळे जमीनदोस्त झाली. अनेक घरांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

– वादळाचा वाढत चाललेला जोर लक्षात घेऊन समुद्रकिनाऱयांवर पर्यटकांना नो एण्ट्री केली असून रायगड व पालघर जिह्यातील आपत्कालीन यंत्रणा तसेच पोलीस यंत्रणादेखील सज्ज झाली आहे.

– रायगड, पालघर जिह्यातील अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवली असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

रेल्वे वाहतुकीला फटका
बोर्डी रेल्वे स्थानकाजवळ गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. आज दुपारी सवा दोनच्या सुमारास वायू वादळाच्या तडाख्यामुळे गर्डरच झुकला. मोठमोठे क्रेन्स तसेच अन्य यंत्रसामग्री त्यासाठी तैनात करण्यात आली होती. पण नैसर्गिक संकटापुढे कुणाचे चालेना. पश्चिम रेल्वे मार्गाची वाहतूकच त्यामुळे बंद करावी लागली. याचा फटका मेल, एक्सप्रेस तसेच लोकल गाडय़ांनाही बसला. दरम्यान विरार व डहाणूदरम्यानची रस्ते वाहतूकही काही काळ बंद करण्यात आली होती.