
रायगड जिल्हा परिषदेचे चतुर्थ कर्मचारी व वाहन चालक हे कामावर असताना दिलेला गणवेश परिधान न करता अन्य पोशाखात कार्यालयात उपस्थित असतात. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक कार्यालयात उपस्थित असताना दिलेला गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे परिपत्रक चार महिन्यांपूर्वी काढले होते.
मात्र जिल्हा परिषदेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक आजही गणवेश परिधान न करता अन्य गणवेशात वावरताना दिसत आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकाला काही कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याचे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याची मिनी विधानसभा असते. जिल्हा परिषदमध्ये बांधकाम, अर्थविभाग, समाजकल्याण, शिक्षण, कृषी, आरोग्य हे विभाग असून या विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच मुख्य विभागातील अधिकारी यांच्या वाहनवरील वाहन चालक यांना शासन निर्णयानुसार विहित करून दिलेले गणवेश परिधान करणे बंधनकारक आहेत.
जिल्हा परिषद मधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक हे कार्यलयीन वेळेत गणवेश परिधान न करता अन्य गणवेशात काम करीत असतात ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळे वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी कोण हे ओळखणे कठीण जाते. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी जुलै महिन्यात परिपत्रक काढून वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी दिलेला गणवेश परिधान करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच या सूचनांचे पालन न करणाऱ्या कर्मचारी व वाहन चालक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे परिपत्रकात म्हटले आहे.
चतुर्थ कर्मचारी आणि वाहन चालक यांना गणवेश धुण्याचा भत्ताही शासनाकडून दिला जातो. तीन वर्षांनी नवीन गणवेशही दिला जातो. असे असताना काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान न करता अन्य गणवेशात कामे करताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या या परिपत्रकानंतरही चतुर्थ कर्मचारी व वाहन चालक आदेशाचे पालन करताना दिसत नाहीत. मात्र त्यांच्यावर अद्यापही कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाकडून झालेली नाही.






























































