शिवरायांचा अवमान करणाऱ्या ‘एनआरएमयू’ रेल कामगार सेनेच्या वतीने निषेध

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या कॅलेंडरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या असंख्य कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यासंदर्भात संतापाला वाचा फोडण्यासाठी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या ‘डीआरएम’ कार्यालयासमोर निषेध सभा घेत जोरदार निदर्शने केली.

याप्रसंगी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव अडसुळ यांनी यापुढे अशी घटना घडल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा दिला. ज्या व्यक्ती महापुरूषांचा अपमान करतात त्यांना मान्यताप्राप्त निवडणुकांमध्ये कामगारांनी धडा शिकवावा असे रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी सांगितले. ज्या संघटना अशा प्रकारची कृत्ये करतील त्यांचा केवळ निषेध न करता मतदान प्रक्रियेत त्यांना त्यांची योग्य जागा दाखवावी असे सरचिटणीस दिवाकर देव यांनी म्हटले. सूत्रसंचालन संयुक्त सरचिटणीस नरेंद्र शिंदे यांनी केले.

दरम्यान, ‘एनआरएमयू’ने ही वादग्रस्त कॅलेंडर मागे घेण्याचे आश्वासन देत माफी मागितली आहे. या निषेध सभेला सहकार्याध्यक्ष जर्नादन देशपांडे, राजू पाटोळे, अर्जुन जामखिंडीकर, सचिव सुरेश परदेशी, तळेकर, खजिनदार स्वप्नील झेमसे, राजू सुरती, उपाध्यक्ष योगेश जाधव, भरत शर्मा, वाहिद शेख, नरेश बुरघाटे, आशुतोष शुक्ला, विनरकर, मल्हारी, भोईटे, उमेश नाईक, महिला आघाडी सोनाक्षी मोरे,स्मिता अवसरमल, मंजूषा माटे, भारती देशपांडे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या