अल-कायदाकडून हल्ल्याची शक्यता, रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अल-कायदाकडून रेल्वे दुर्घटनेसाठी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नवी दिल्लीतील रेल्वे मुख्यालयाने सर्व रेल्वे स्थानकांना पत्र पाठवून अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सावध राहण्याची सुचना दिली असून कोणतीही संशयीत हालचाल दिसून आल्यास तात्काळ मुख्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, अल-कायदा ही दहशतवादी संघटना हिंदुस्थानात रेल्वे अपघाताचा कट रचत असून यासाठी दहशतवाद्यांना आपल्या तळावर रेल्वे रुळावरून घसरवण्यासाठी काय करावे याचे ट्रेनिंग देत आहे. अल-कायदाचा हा कट उघड झाल्यानंतर रेल्वेकडून रेल्वे स्थानक आणि सुरक्षा कर्माचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अल-कायदा हिंदुस्थानातील रेल्वे गाड्यांना निशाणा बनवण्याची धमकी देत आहे आणि अशातच रेल्वे अपघातासाठी दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात येत असल्याचे दिसून आल्याने रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे.

नवी दिल्लीच्या रेल्वे मुख्यालयाने गाझियाबाद, तुगलकाबाद, पानीपत, दिल्ली, निझामुद्दीन, पलवल, आनंद विहार, मेरठ आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकांना पत्र पाठवण्यात आले असून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. यापूर्वी रमजानमध्ये दहशतवाद्यांनी मुंबईतील लोकल ट्रेन उडवण्याची धमकी दिली होती. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या असून दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर रेल्वे असल्याचे स्पष्ठ झाले आहे.