रेल्वेचे डबे सोडून इंजिन पळाले पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली! वाचा काय झालं..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, चंद्रपूर

21 डबे सोडून केवळ 3 डब्यांसह इंजिन पळाल्याची घटना चंद्रपुरात घडली. पण, तब्बल चार तासानंतर हे इंजिन परत आलं आणि गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. त्यासोबत श्वास रोखून धरलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

पाटणा-बंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस शुक्रवारी नागपूरवरून रात्री साडेसहा वाजता निघाली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराजवळ रात्री आठ वाजताच्या सुमारास पोचताच डब्याना जोडणारं कपलिंग तुटलं. त्यामुळं 24 डब्यांच्या या गाडीचे तीन डबे इंजिनला चिकटून राहिले, तर 21 डबे मागे पडले. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी ही गाडी ताशी 100-120 किलोमीटर वेगानं धावत होती. डबे वेगळे झाल्यानंतर विनाइंजिन 21 डबे दोन ते तीन किलोमीटर धावत राहिले. यावेळी हे डबे अनियंत्रित होऊन रुळावरून घसरू शकले असते. मात्र सुदैवाने असं काही झालं नाही.

या प्रकारामुळं प्रवाशांत एकच खळबळ उडाली. पुढे गेलेलं इंजिन पाच किलोमीटर पुढे निघून गेल्यावर चालकाला हा प्रकार लक्षात आला. शेवटी रेल्वे अधिकाऱ्यांना हा प्रकार माहीत झाल्यावर गतिमान हालचाली करीत दुसरं इंजिन 21 डब्यांना जोडून गाडी वरोरा स्थानकावर लावण्यात आली आणि पुढे गेलेलं इंजिन परत आणून तब्बल 3 तासांनी गाडी बंगळुरूच्या दिशेनं रवाना करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनानं दिले आहेत.