Railway Accident – लोकल ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर धडक, 6 प्रवाशांचा मृत्यू; अनेक जखमी

लोकल ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते.

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील लालखदानजवळ मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वेकडून अधिकृत निवेदन अद्याप जाहीर झालेले नाही. समोरासमोर झालेल्या धडकेत प्रवासी ट्रेन आणि मालगाडीचे अनेक डबे रुळावरून घसरले. प्रवाशांच्या जीवितहानीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. या धडकेमुळे ओव्हरहेड वायर आणि सिग्नल सिस्टीमचे नुकसान झाले आहे. प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. अपघाताची रेल्वेने चौकशी सुरू केली आहे. प्रवाशांना अपडेटसाठी हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.