
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसएमटी) येथे जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारण्यात येणार होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामुळे हे संग्रहालय बारगळले आहे. रेल्वे बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला आहे. संग्रहालयासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करणे बोर्डाला शक्य नसल्याचे सांगत हा प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिलमध्ये नवी दिल्लीत रेल्वे बोर्ड अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत पंतप्रधानांनी संग्रहालयाच्या प्रकल्पाला विरोध दर्शवला. संग्रहालयासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याची काय गरज आहे, असा सवाल मोदी यांनी अधिकाऱ्यांना केला. या प्रकल्पासाठी गुंतवणूक म्हणून निधी खर्च केल्यास त्याचा काय आणि कसा उपयोग होईल, असेही त्यांनी विचारले. संग्रहालयासाठी निधी खर्च करण्याऐवजी स्थानकांच्या भिंतीवर डिजिटल संग्रहालय उभारण्याची सूचना त्यांनी केली. या प्रकारच्या डिजिटल संग्रहालयातून इतिहास आणि वर्तमानकाळ मांडता येईल, असेही त्यांनी सांगितले. देशभरातील २२ स्थानकांमध्ये प्रायोगित तत्त्वावर डिजिटल वस्तूसंग्रहालय सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र रेल्वे मंत्रालयाकडून देशातील सर्व रेल्वे महाव्यवस्थापकांना पाठवले आहे.
सीएसएमटी येथील मुख्य इमारतीत अद्ययावत वस्तूसंग्रहालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी ५० कोटीचा खर्च अपेक्षित होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पाहणी केल्यानंतर याबाबतची सूचना केली होती. जागतिक वारशाचा दर्जा लाभलेल्या या इमारतीचे संग्रहालयात रुपांतर करण्यास कामगार संघटनांनीही विरोध केला होता.



























































