
नवनियुक्त रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बहुचर्चित मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा काल आढावा घेतला. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पेरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांनी रेल्वेमंत्र्यांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती त्यांना दिली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 8 जुलै रोजी रेल्वेमंत्री पदाचा चार्ज घेतल्यानंतर रेल्वेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. रविवारी त्यांनी अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची माहिती घेतली. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण 1,396 हेक्टर जमिनीची गरज असून आतापर्यंत 1,035 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 74 टक्के जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून त्यापैकी 96 टक्के जमीन एकटय़ा गुजरात राज्यातील आहे, 25 टक्के जमीन महाराष्ट्रातील लागणार आहे, तर केंद्रशासित प्रदेश दादरा, नगर हवेली येथील 96 टक्के जमीन लागणार असून तिचे संपादनही पूर्ण झाले आहे. गुजरात आणि दादरा, नगर हवेली येथील बुलेट ट्रेनच्या 351 कि.मी. मार्गापैकी 325 कि.मी. मार्गाचे रेखांकन आणि सिव्हिल बांधकामांचे आणि पाच स्थानकांचे कंत्राट यापूर्वीच देण्यात आले असून टप्प्याटप्प्याने काम सुरू झाले आहे. तीनशे मोठय़ा मशीन आणि 2,200 कर्मचाऱयांचा स्टाफ या कामासाठी जुंपला आहे. कंत्राटदारांना 90 टक्के जमीन ताब्यात देण्यात आली आहे. 785 ठिकाणी जिओ टेक्निकल सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सहा ठिकाणी पायलिंग कास्ट टेस्ट पूर्ण करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील काम ठप्प
सध्या दहा साईटवर बांधकाम सुरू असून उरलेल्या आठ टक्के मार्गिकेचे आणि तीन स्थानकांच्या बांधणीचे कंत्राट या वर्षाअखेर, तर साबरमती डेपोच्या बांधकाम कंत्राट पुढील वर्षी जानेवारीमध्ये देण्यात येणार आहे. 237 किमीचा ट्रक टाकण्याचे कामही या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सुरू होईल आणि गुजरातमधील उर्वरित ट्रक टाकण्याचे काम पुढच्या वर्षी सुरू होईल. महाराष्ट्रातील जमीन संपादन पूर्ण न झाल्याने प्रक्रिया रखडली आहे. 80 टक्के जमीन ताब्यात आल्यानंतरच बांधकामासाठी टेंडर काढता येते.




























































