
सामना ऑनलाईन । मुंबई
रेल्वे डब्यांच्या भिंतीवर एखाद्या बाबा-बुवाचं पोस्टर पाहायला मिळणं ही कोणत्याही मुंबईकरासाठी अतिशय सामान्य बाब आहे. अनेक गरजू व्यक्ती अशा पोस्टर्सना भुलतात आणि स्वतःची फसगत करून घेतात. रेल्वे पोलिसांनी अशीच पोस्टर्स लावून लोकांना लुटणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे.
साहिल अब्बासी (२१) आणि इर्शाद शेख (२०) अशी या दोन तरुणांची नावं असून ते मूळचे मेरठ येथील रहिवासी आहेत. हार्बर मार्गावरच्या रेल्वेमध्ये हे दोघे बाबा-बुवांचे पोस्टर्स लावताना पकडले गेले. कुर्ला येथे कर्तव्यावर असणाऱ्या एका रेल्वे पोलिसाने डब्यांमध्ये पोस्टर्स लागल्याचं पाहिलं. नीट निरीक्षण केल्यानंतर यातील बहुतेक पोस्टर्स नुकतीच लावल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने संपूर्ण ट्रेनमध्ये शोधलं असता साहिल आणि इर्शाद पोस्टर्स चिकटवताना सापडले. त्यांच्याकडून रेल्वे पोलिसांनी २० हजार पोस्टर्स जप्त केले.
हे पोस्टर्स गुरू रहमानजी अजमेरी, गुरू मां खान, मन्नान शाह, राजा बंगाली अशा भोंदूबाबांच्या नावाचे होते. या पोस्टर्समध्ये दिलेल्या फोन क्रमांकांपैकी एक क्रमांक या दोघांपैकी एकाचा असे. हे दोघेच बाबा बनून लोकांची फसवणूक करत होते. जे लोक यांच्याशी संपर्क साधत त्यांना भुलवून त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचं आश्वासन देत. त्याच्यासाठी लागणारे पैसे एका अकाउंटमध्ये जमा करण्यास सांगत आणि पैसे जमा झाली की ते घेऊन पोबारा करत. रेल्वे पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

























































