
लोकल ट्रेन पकडण्याच्या घाईत प्रवासी प्लॅटफॉर्म व फूटबोर्डमधील पोकळीत अडकण्यापासून थोडक्यात बचावला. रेल्वे पोलिसाने प्रसंगावधान दाखवून प्रवाशाला पोकळीत अडकण्यापासून बाहेर काढले. त्यामुळे त्या प्रवाशाचे प्राण वाचले. किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
हार्बर लाईनवरील किंग्ज सर्कल स्थानकात गर्दी नसतानाही प्रवाशाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्म पोकळीत अडकणार होता. तितक्यात संबंधित प्लॅटफॉर्मवर असलेल्या वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबलने तातडीने धाव घेतली. पोलिस कॉन्स्टेबलने प्रसंगावधान दाखवून त्या प्रवाशाला पोकळीत अडकण्याआधी बाहेर काढले. नंतर पोलीस कॉन्स्टेबल आणि होमगार्डने प्रवाशाला सुरक्षित ठिकाणी नेले. प्रवाशाचे प्राण वाचवणाऱ्या रेल्वे पोलिस कॉन्स्टेबलचे काwतुक केले जात आहे. प्रवाशांनी धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.