50 स्थानके, दीडशे ट्रेन खासगी कंपन्यांकडे सोपवणार, रेल्वे खासगीकरणाच्या ट्रॅकवर

दिल्ली ते लखनऊ अशी देशातील पहिली खासगी ट्रेन चालू केल्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाने 50 रेल्वे स्थानके आणि 150 ट्रेनच्या खासगीकरणासाठी एक समिती स्थापन करून पुढचे पाऊल उचलले आहे.

दिल्ली हे लखनऊ ‘तेजस’ एक्प्रेसचे खासगीकरण झाल्यानंतर पाठोपाठ पश्चिम रेल्वेही मुंबई ते अहमदाबाद अशी खासगी ‘तेजस’ एक्प्रेस चालविणार आहे. या ट्रेनमध्ये विमानाप्रमाणे एअर होस्टेसच्या धर्तीवर ‘रेल होस्टेस’ असून त्याचे तिकीटही विमानाप्रमाणेच ‘डायनामिक’ फेअर तत्त्वावर आधारित आहे. आता केंद्र सरकारने त्यापुढे जात देशातील 50 रेल्वे स्थानके आणि 150 ट्रेनचे खासगीकरण करण्यासाठी एक समिती स्थापना केली असून त्यात नीती आयोगाचे  सीईओ, रेल्वे बोर्डाचे चेअरमन, अर्थ मंत्रालयाचे सचिव, गृहनिर्माण आणि नागरी मंत्रालयाचे सचिव आणि फायनान्शियल कमिशनर (रेल्वे) यांचा समावेश आहे.

रेल्वे युनियनचा विरोध

यापूर्वी रेल्वेने 150 रेल्वेचे परिचालन प्रायव्हेट कंपन्यांकडे सोपविण्याची तयारी केल्याची बातमी बुधवारी आली होती. रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. या खासगीकरणाला रेल्वे कामगार युनियनने विरोध केला असून जागोजागी निदर्शनेही सुरू केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या