वाया गेले तेवढे दिवस रेल्वे पासाला मुदतवाढ मिळणार! युटीएस अ‍ॅपवरही लवकरच बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यात आली असून 22-23 मार्च पासून ज्यांचे सिझन तिकीटाचे ( रेल्वे पास ) जेवढे दिवस वाया गेले. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्या सर्वांना वाया गेलल्या दिवस जुना पास दाखवताच वाढवून देण्यात येणार आहे. तसेच सरकारी ओळखपत्र दाखवताच नवा रेल्वे पास आणि तिकिटेही काढता येत आहेत.

सोमवार पासून केवळ अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी अटी आणि शर्तींवर मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गांवर उपनगरीय लोकलच्या सुमारे साडे तीनशे फेरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे बेस्ट आणि एसटीवरील भार थोडा फार हलका होईल असे म्हटले जाते आहे. या साधारण तीन महिन्यांत अनेक प्रवाशांचे रेल्वे पास वाया गेल्याने त्याची भरपाई करण्यात यावी अशी मागणी मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आणि ‘झेडआरयूसीसी’चे सदस्य शशिकांत पर्येकर यांनी रेल्वे बोर्डाला केली होती.

मुंबई उपनगरीय लोकल प्रवासी तीन महिन्यांचे किंवा वार्षिक मुदतीचे रेल्वे पास काढत असल्याने त्यांचे नुकसान मोठे झाल्याचे रेल्वे मंत्रालयाला पर्येकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. ‘अनलॉक 1.0’ सुरू झाल्याने अत्यावश्यक सेवा घटकांसाठी सोमवारपासून मर्यादित स्वरूपात उपनगरीय सेवा सुरू करतानाच रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेत ज्या रेल्वे प्रवाशांचे पासाचे जेवढे दिवस वाया गेले आहेत, त्यांच्या रेल्वे पासांत तेवढ्याच दिवसांची मुदतवाढ लवकरच करण्यात येणार आहे. तसेच ‘युटीएस’ अ‍ॅपवरही लवकरच बदल करण्यास रेल्वेची उपकंपनी ‘क्रीस’ ला सांगण्यात आले आहे.

केवळ सरकारी आणि खाजगीआरोग्य कर्मचार्‍यांना प्रवेश

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन शिथील करताना उपनगरीय लोकल चालविण्याची राज्य सरकारची मागणी काही अटी व शर्थींवर मान्य करण्याचे काल रात्री उशीरा पालिका अणि रेल्वे कर्मचार्‍यांच्या बैठकीत निश्चित झाले. त्यामुळे पहाटे साडे पाच वाजल्यापासून विरारपासून पश्चिम रेल्वेने फेर्‍या सुरू केल्या आहेत. पश्चिम रेल्वे 162 फेर्‍या चालवित आहे, तर मध्य रेल्वेने 200 फेर्‍या सुरू केल्या आहेत. या लोकल ट्रेनमध्ये केवळ सरकारी ओळखपत्र असलेल्यांना आणि खाजगी आरोग्य सेवेसह अत्यावश्यक घटकांनाच रेल्वे सुरक्षा बल ओळखपत्र पाहूनच रेल्वे स्थानकांत प्रवेश देत आहे.

एका डब्यांत केवळ 60 प्रवासी

उपनगरीय रेल्वे लोकलमध्ये कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ एका डब्यांत 60 प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. १२ डब्यांच्या एका लोकलमध्ये अडीच हजार क्षमता असताना केवळ ७०० प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे.